वणी :-
जीव धोक्यात घालून साप व अन्य प्राणी पकडून सुरक्षितस्थळी सोडणाऱ्या सर्पमित्र, प्राणीमित्रांना शासनाने सोयीसुविधा द्याव्या, अशी मागणी अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणी मित्र संघटनेच्या वतीने जिवनसृष्टी संस्थेचे अध्यक्ष हरिष कापसे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार वणी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संस्थेचे सदस्य गेल्या १० वर्षांपासून वणी तालुक्यात वन्यजीव संरक्षणाचे काम करीत आहेत. आतापर्यंत अनेक प्राणी, पक्षी, सरपटणारे साप, घोरपड आदी जीवांना जीवनदान दिले. त्यामुळे साप पकडण्यासाठी जिवनसृष्टी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना टॉर्च, सेफ्टी किट, बूट, दुर्बीण, व साप हाताळताना मृत्यू झाल्यास सर्पमित्रांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी,
वाघापेक्षा सर्पदंशाने अधीक मृत्यू
साप हा प्राणी वन्यजीव असल्याने वाघ व इतर वन्य जीवाप्रमाणे सापाला संरक्षण देण्याचे काम वनविभागाचे आहे. परंतु मनुष्यबळाचा अभाव असल्याने वनविभागाचे कार्य माणुसकीच्या भावनेतून जीव धोक्यात घालून सर्पमित्र करीत आहेत. परंतु सर्पमित्रांच्या मागण्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. वाघापेक्षा सर्पदशाने मृत्यूझालेल्यांची संख्या अधिक असल्याने सापांना मानवी वस्तीपासून दूर नेण्याचे काम सर्पमित्र करीत आहेत. मात्र मानवी जीवनांचे रक्षण करणाऱ्या सर्पमित्रांचेच जिवन धोक्यात आले आहे त्यामुळे सर्पमित्र प्राणीमित्रांना शासनाने सर्पमित्र प्राणी मित्रांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी जिवन सृष्टी संस्थेचे अध्यक्ष हरिष कापसे, गजु क्षीरसागर सिदार्थ दुबे, आर्य कवाडे, रज्जाक हुसेन यांनी निवेदनातुन केली आहे.